Episodi
-
जगभरातील मराठीजनांमध्ये आत्मविश्वास जागवत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांत उभं करण्यासाठी गर्जे मराठी ही संस्था उदयास आली. आता ही संस्था एक चळवळ बनली आहे. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी गर्जे मराठीचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू यांसमवेतच्या या संवादातून. प्रत्येक मराठीजनास अभिमान वाटावा, अशा या विचारांना ऐकणं म्हणजे मनात नव्या प्रेरणा जागवणं...
-
Episodi mancanti?
-
दिल्ली आणि महाराष्ट्रातील संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त फोडले असे म्हणतात...तर महाराष्ट्रगीतात महाराष्ट्र हे दिल्लीचेही तख्त राखतो असे म्हणतात. या अनुषंगाने इतिहासाचे संशोधक व प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक संबंधांचा वेध संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून घेतला आहे. प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, असा हा स्पेशल पॉडकास्ट.
-
जगातील एक आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाणारे स्टोरीटेल भारतात येऊन ७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद.
-
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. ते कसे जिंकले, आता ते काय करतील, भारताला त्याचा फायदा आहे का, अमेरिकेतील भारतीय त्याकडे कसे बघतात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्यूबर अमेरिकन भाऊ अर्थात राहुल पाटील यांना बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे आणि योगेश दशरथ यांनी. मित्रांमधल्या सहज गप्पांमधून अमेरिकेच्या भविष्याविषयी होणारं हे भाष्य फार गंभीरपणे घेऊ नये..मात्र त्याची नोंद जरुर ठेवावी अशा अनेक गोष्टी इथे उलगडतील.
-
कोणतंही गाणं आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यामागे त्या गायकासह अनेकांचे प्रचंड कष्ट असतात. एरव्ही गाणं म्हणणं आणि ते स्टुडिओत रेकॉर्ड करणं यात मोठा फरक आहे. कला, शास्त्र, तंत्र आणि प्रतिभा या सर्व गुणांचा मिलाफ स्टुडिओत पाहायला मिळतो. याच विषयावर प्रसिद्ध गायक अवधूत गांधी आणि डॉन स्टुडिओत रेकॉर्डिंग विभागाची धुरा वाहणारे प्रसिद्ध साउंड इंजिनिअर तुषार पंडीत यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून गायक आणि रेकॉर्डर यांच्यातील एक आगळं नातं पुढं आलं. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे हे दोन्ही दिग्गज त्यांच्या आजवरच्या प्रवासाकडे कसे पाहतात, त्यांचं आगळं जग त्यांनी कसं उभं केलं, त्यातील टर्निंग पॉइंटस् कोणते आणि या क्षेत्रात पुढं येऊ इच्छिणाऱ्या तरुणांनी काय तयारी करायला हवी अशा अनेक बाबींची छानशी उलगड या दिवाळी स्पेशल पॉडकास्टमध्ये होते. जरुर ऐका आणि इतरांनाही ऐकवा.
-
महाराष्ट्रातील यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी अभूतपूर्व अशी आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये सत्तेत येण्यासाठी तुंबळ लढाई सुरु झालेली आहे. दुसरीकडे सामान्य मतदारही कमालीचा अस्थिर झाल्याचे चित्र आहे. या साऱ्या चित्राकडे पाहता सध्याचे राजकारण कोठे जाते आहे, कोणाचे काय चुकते आहे, कोणत्या पक्षाची काय बलस्थाने आणि उणीवा आहेत आणि मतदारांनी नेमके काय करायला हवे याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सल्लागार राजेंद्र हुंजे यांनी आपली परखड मते मांडली आहेत, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या दिवाळी स्पेशल पॉडकास्ट मध्ये. जरुर ऐका, आणि हे राजकीय फटाके कोणते असतील, हे जाणून घ्या.
-
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठं फिरायला जावं असा एक प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच, या प्रश्नाची उलगड करण्यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे, पर्यटन सल्लागार व स्मिता हॉलिडेज् या नामांकित संस्थेच्या संचालक प्रज्ञा गोरे यांना. सध्या कोणती पर्यटनस्थळे ट्रेंडिंग आहेत, या सिझनमध्ये कुठे कुठे जाता येऊ शकते इथपासून ते सर्वांपेक्षा वेगळी अशी ऑफबिट डेस्टिनेशन्स कोणती आहेत, याची छानशी उकल प्रज्ञाने यामध्ये केलेली आहे. फिरायला जावेसे वाटणाऱ्यांनी आवर्जून ऐकावा, असा हा पॉडकास्ट.
-
दिवाळी जवळ आली की आपल्याकडे दिवाळी अंकांचे आगमन सुरु होते. यंदा `मास्टर की` नावाचा दिवाळी अंक प्रथमच वाचकांच्या भेटीस येत आहे. हा रहस्यकथा विशेषांक आहे. त्याचे स्वागत करतानाच, एकूणच दिवाळी अंकांचं रहस्यकथांशी असणारं नातं, या दिवाळी अंकातील रहस्यकथांचे वेगळेपण तसेच त्यातील संपादनाचा अनुभव या विषयावर संतोष देशपांडे यांनी बोलतं केलं आहे `मास्टर की` ची संपादकीय धुरा ज्यांनी सांभाळली ते संपादक सम्राट शिरवळ यांना. दिवाळी अंकांच्या दुनियेतील हा वेगळा प्रयोग रसिकांपुढे येताना त्यानिमित्त रंगलेला हा पॉडकास्ट ऐकणं हा देखील एक आगळा अनुभव ठरावा.
-
जगभरात मोठे अस्थिर वातावरण आहे. इस्त्रायल -इराण यांच्यातील थेट युद्ध ते अमेरिका, चीन, रशिया यांच्यातील सुप्त संघर्ष आणि त्यातून वेगाने पाहणारे जागतिक चित्र, यांचा आढावा घेतानाच असा स्थितीत, भारतात आयटी किंवा संगणक क्षेत्रात अभियंते होऊन उत्तम करिअर करु पाहणाऱ्यांपुढे काय आव्हाने असणार आहेत, याचा नेमका वेध स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांच्या गप्पांमधून घेतला गेला आहे. आयटी क्षेत्रात करिअर करु पाहणाऱ्या प्रत्येकाने अन् त्याच्या पालकांनी ऐकालयाच हवा असा हा पॉडकास्ट.
-
गणेशोत्सव सोहळ्यात खरे रंग भरतात ते ढोल ताशा पथकांकडून केले जाणारे जल्लोषमय वादन. पुण्यातून सुरु झालेली ही ढोल-ताशा संस्कृती आता जगभरात विस्तारली आहे. मात्र, ढोलताशा पथकांत काम करणाऱ्यांचे जग नक्की काय असते, ते कोणत्या भावनेतून वादन करतात, त्यातून त्यांना काय मिळते, ढोलताशांचे अर्थकारण काय असते, अशा पथकांपुढची आव्हाने काय असतात या व अशा अनेक प्रश्नांची उलगड पुण्यातील अग्नी या ढोलताशा पथकाचे प्रमुख मंदार गोसावी यांनी संतोष देशपांडे यांच्याशी बोलताना केली आहे. हा पॉडकास्ट एकूणच ढोलाताशांविषयी आपल्या मनात येणाऱ्या अनेक प्रश्नांची सहज उलगड करतो आणि त्यांच्यापुढच्या प्रश्नांनाही वाचा फोडतो.
-
स्वीडन...युरोपातील उत्तरेकडील एक प्रगत आणि सुंदर राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या या देशात तेथील महाराष्ट्रीय किंवा मराठी समाजाने आपली सांस्कृतिक ओळख, परंपरा जतन करण्यासाठी कायमच पुढाकार घेतला आहे. स्वीडनची राजधानी असलेल्या स्टॉकहोम येथील महाराष्ट्र मंडळ हे तेथील तमाम मराठीजनांचे प्रतिनिधित्व करते. या संघटनेच्या माध्यमातून स्टॉकहोमला मराठी भाषा, संस्कृती, परंपरा जपण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम चालविले जातात. गणेशोत्सव हा त्यांच्यासाठी एक मोठा उत्सव असतो. गणरायांच्या आगमनाच्या निमित्ताने, स्टॉकहोम येथील मराठीजन एकत्र येऊन गणेशोत्सव कसा साजरा करीत आहेत, भाषा, संस्कृतीचे जतन करण्यासाठी ते कशा पद्धतीने कार्यरत आहेत, महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोम सर्वांना एका धाग्यात बांधत हे कार्य कसे पुढे नेते आहे यासाठी संतोष देशपांडे यांनी बोलतं केले आहे, महाराष्ट्र मंडळ स्टॉकहोमचे प्रतिनिधी मृणाल पवार आणि अविनाश डोंगरे यांना. त्यांच्या समवेतच्या गप्पांमधून साता समुद्रापारची ही मराठी मंडळी आपल्या संस्कृती व परंपरेचे जतन करण्यासाठी किती धडपड करत असते आणि त्यांच्या मनात काय भावना असतात, याची छानशी उलगड होते.
-
घटनेने दिलेल्या आरक्षणात वर्गवारी व्हायला हवी का, असा एक महत्त्वाचा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे चव्हाट्यावर आला आहे. घटनेने दिलेल्या आरक्षणात क्रिमिलेअरसारखे निकष लावून वंचितांतील वंचितांना पुढे यायची संधी मिळावी, असे अनेकांना वाटते, तर मूळात अशा प्रकारे भेद करता येणार नाही, असे दुसऱ्या बाजूचे म्हणणे आहे. या संवेदनशील विषयावर, ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व जातीव्यवस्थेचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी आरक्षणात वर्गवारी असायला हवी, अशी भूमिका घेतली आहे. संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून त्यांनी आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. देशाच्या दृष्टीने आरक्षणातील वर्गवारी हा विषय किती महत्त्वाचा आहे, त्याचे काय दूरगामी परिणाम होऊ शकतात याची उलगड करणारा हा परखड पॉडकास्ट.
-
आगामी काळात जगभरात नोकऱ्यांवर गदा येणार असल्याचे भाकित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, नोकरी ही संकल्पना कशी बदलते आहे, का बदलते आहे तसेच वेगळ्या भाषा शिकल्याने करिअरचा आलेख उंचावता येणे कसे शक्य आहे, याविषय विश्लेषण केले आहे स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या या गप्पांमधून. जरुर ऐका आणि भविष्याचा कानोसा आताच घ्या.
-
उद्यमी तरुणाई हे भारताचे भूषण. ज्या तरुण उद्योजकांनी आपल्या पूर्वीच्या पिढीपासून आलेला उद्योगाचा वारसा पुढे नेताना आपला स्वतःचा ठसा उमटविला आणि आपल्या उद्योगाला नवी दिशा दिली, अशा नेक्स्टजेन उद्योजकांच्या यशाची गाथा म्हणजेच मूव्हिंग ॲस्पिरेशन्स. प्रेरक लेखक दत्ता जोशी यांच्या संकल्पनेतून आणि शब्दांतून आपल्यापुढे आलेली ही नवकर्तृत्वाची शोधयात्रा दोन भागांमधून मुद्रित तसेच पॉडकास्ट माध्यमातून श्राव्यरुपात वाचक-श्रोत्यांपुढे आली आहे. यानिमित्ताने, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या गप्पांमधून या अभिनव प्रयोगाची सहज उलगड तर होतेच आणि त्यातून दत्ता जोशी यांना आपल्या उद्ममशील लेखनप्रवासातून गवसलेली उद्यमशीलतेची स्पंदनेही आपणास ऐकू येतात. प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा कट्टा स्पेशल पॉडकास्ट जरुर ऐका...
-
आगामी अ.भा. मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्याचे निश्चित झाले. मात्र, त्यावर महाराष्ट्रातील अनेकांनी, विशेषतः ग्रंथविक्रेत्यांनी नापसंती व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर, दिल्लीमध्ये मराठी साहित्य आयोजित करणे का ऐतिहासिक आहे, त्यातून नेमके काय साध्य होणार आहे याविषयी परखड भाष्य केले आहे ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक संजय सोनवणी यांनी. संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या कट्ट्यावरील गप्पांमध्ये सोनवणी यांनी मराठी लोकांच्या दिल्लीकडे पाहण्याच्या मानसिकतेवरही भाष्य केले आहे.
-
किशोरकुमार असं नुसतं म्हटलं तरी त्याची असंख्य गाणी मनात गुंजू लागतात. मन प्रसन्न करुन जातात. कैक पिढ्यांचं भावजीवन त्यांच्या जादुई आवाजावर पोसलं गेलं आहे. अशा या किशोरदांना गुरुस्थानी मानून गेली २५ वर्षे अविरत गायन करणारे आणि `व्हाइस ऑफ किशोरकुमार` अशी कीर्ती लाभलेले प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक यांचे `किशोरमय` विश्व देखील अद्भूत आहे. हे विश्व जाणून घेण्यासाठी, त्यांच्या नजरेतील किशोरदा जाणून घेण्यासाठी संतोष देशपांडे यांनी त्यांना बोलतं केलं आणि स्टोरीटेल कट्ट्यावर रंगली किशोरदांवरची मैफल...या हुरहुन्नरी, अजरामर कलाकाराच्या जन्मदिनाच्या (४ ऑगस्ट) पूर्वसंध्येला, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी..तुमच्या-आमच्या मनातील किशोरदांच्या गाण्यांना पुन्हा ओठावर आणण्यासाठी! कट्ट्यावरची ही स्पेशल मैफल, किशोरदांना अर्पण!
-
सध्या जगभरात अनेक पातळ्यांवर उलाथापालथ सुरु आहे. क्रीडा क्षेत्रात टी२० वर्ल्डकप, विम्बल्डन, युरो, कोपा अमेरिका अशा स्पर्धांनी मागचा आठवडा गाजवला. तोवर मुद्दा पेटला तो अमेरिकेत माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा. त्यानिमित्ताने, अमेरिकेत हे गन-कल्चर कसे आहे, त्याची मूळं कुठे आहेत याचा वेध घेतला स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश देशपांडे आणि संतोष देशपांडे यांनी या पॉडकास्टमधून. ग्लोबल विषयांचा हा धावता आढावा घेताना इथे योगेशने दिल्या आहेत स्टोरीटेलवरील काही इंटरेस्टिंग बुक टीप्स! जरुर ऐका..
-
पंढरपूरला विठुरायाच्या ओढीने अवघ्या महाराष्ट्रातून वारकरी धाव घेतात. या वारीमध्ये असं नेमकं काय असतं, जे त्यांना एका सूत्रात बांधतं? अलीकडच्या काळात वारीला इव्हेंट म्हणून पाहणारा वर्ग उदयास येताना दिसतो. त्याचवेळी राज्यातील सामाजिक वातावरणही जाती-जातींमधील अविश्वासातून बिघडू पाहते आहे. या पार्श्वभूमीवर, वारी म्हणजे नेमके काय, ती काय साध्य करते, काय संदेश देते यावर संत साहित्याचे अभ्यासक, पत्रकार डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी परखड भाष्य केले आहे. संतोष देशपांडे यांसमवेत त्यांनी साधलेल्या या संवादातून वारीचे नेमके आकलन तर होतेच शिवाय महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेतून महाराष्ट्र धर्माचे दर्शन होते. प्रत्येकाने मन लावून ऐकावा आणि हृदयात साठवावा, असा हा संवाद `या हृदयीचा त्या हृदयी` पोहोचावा.
-
आर्थिक गुन्हेगारी उघडकीस आणणारे फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे नेमके काय, त्यात काय केले जाते, देशातील अनेक आर्थिक घोटाळे उघडकीस आणण्यात या तज्ज्ञांचे योगदान किती मोठे आहे या गोष्टी सर्वसामान्य लोकांसाठी नवीन आहेत. पुण्यातील फॉरेन्सिक ऑडिटर अपूर्वा जोशी यांनी याच विषयावर लिहिलेले आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले. ते सध्या अत्यंत गाजते आहे. या पार्श्वभूमीवर, खुद्द लेखिका अपूर्वा जोशी यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आणि त्यातून अनेक अज्ञात पैलू उलगडत गेले. जरुर ऐका आणि इतरांनाही आवर्जून ऐकवावा असा हा कट्टा स्पेशल पॉडकास्ट.
- Mostra di più